
राजापूर तालुक्यातील ओणी येथे विनापरवाना गुरे वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
राजापूर तालुक्यातील ओणी येथे गुरांची विनापरवाना वाहतूक करणार्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गाडीत असलेली जनावरे मूळ मालकाकडे परत दिली आहेत. या प्रकरणी गुरांची वाहतूक करणार्या प्रबोध भिवा तांबे याच्याविरोधात राजापूर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक मोबीन शेख, शिपाई दीपक काळे व वाहन चालक विश्वास बाणे हे मंगळवार ८ एप्रिल रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना रात्री १० च्या सुमारास ओणी येथील पेटोल पंपामध्ये एक बोलेरो पिकअप गाडी संशयास्पदरित्या उभी असलेली पोलिसांच्या निदर्शनास आली.
पोलिसांनी संबंधित वाहनचालक प्रबोध भिवा तांबे याच्याकडे चौकशी केली असता सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पोलिसांनी गाडी.. उघडून पाहिली असता गाडीमध्ये तीन गुरे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संबंधित चालकाकडे गुरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना गुरे वाहतूक केल्याप्रकरणी वाहन चालक प्रबोध तांबे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने गाडीतील गुरे मालकाकडे परत देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.www.konkantoday.com