
खरवते येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयामध्ये सह्याद्री कृषी क्रीडा संग्रामचा थरार आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा उत्साहात.
आबलोली. खरवते-दहिवली (ता. चिपळूण) येथील शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयात सह्याद्री कृषी क्रीडा संग्राम थरार मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात नुकताच उत्साहात संपन्न झाला. यामध्ये क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो- खो, बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ, रस्सीखेच, ॲथलॅटीक्स यांचा समावेश होता.यंदा महाविद्यालयाच्या स्व. गोविंदराव निकम क्रीडानगरीमधील नुकत्याच साकारण्यात आलेल्या टर्फ क्रिकेट मैदानावर क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये चतुर्थ वर्षातील मुलांनी विजेते पद व तृतीय वर्षातील मुलांनी उपविजेतेपद पटकावले.
व्हॉलीबॉल (मुले) क्रीडा प्रकारामध्ये द्वितीय वर्ष अन्न तंत्रज्ञान शाखेने विजेतेपद, तर द्वितीय वर्ष कृषी शाखेने उपविजेतेपद संपादन केले. मुलींच्या गटात कृषी शाखेने प्रथम, तर तृतीय वर्ष कृषी यांनी द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. बॅडमिंटन क्रीडा प्रकारामध्ये भाविका धसाडे, आयुषा निकम, आदित्य कुदळे, भुषण तळेकर, सनी चांगण व शिवराज रिकीबे यांनी प्रथम व द्वितीय अनुक्रमे क्रमांक मिळवला.ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये वेद गिते, अभिनव शिंदे, रवीना दसवत, सृष्टी मोरे, समृद्धी मोरे, अवधुत काळे, श्याम गावंड, पार्थ निकम, श्रावनी सांगरे, ऐश्वर्या लांडगे व रिया भोई यांनी विजय मिळवला. टेबल टेनिस स्पर्धेमध्ये ईशा पाटील, तेजस्वी राणे, अनामिका सावंत, मयुरी नलवडे, अवनिश बर्डे, सिद्धार्थ राणे, माधव क्षीरसागर, तेजस भेलके व प्रफुल्ल वायकर यांनी विजय मिळवला.
कॅरम (मुले) स्पर्धांमध्ये अनिरूद्ध कोळेकर, साहिल म्हात्रे, अभिषेक पवार (द्वितीय वर्ष कृषी) व मुलींमध्ये प्रणाली आयरे (तृतीय वर्ष कृषी) यांनी विजेतेपद मिळवले. बुद्धिबळ क्रीडा प्रकारामध्ये द्वितीय वर्ष कृषी व तृतीय वर्ष उद्यानविद्या यांनी विजेतेपद पटकावले. खो-खो स्पर्धांमध्ये चतुर्थ वर्ष कृषीच्या मुली व द्वितीय वर्ष कृषीच्या मुलांनी प्रथम क्रमांक मिळवला. कबड्डीमध्ये चतुर्थ वर्ष कृषी मुले व मुली विजेते ठरले. रस्सीखेच क्रीडा प्रकारात द्वितीय कृषी मुले व तृतीय वर्ष कृषी मुली यांनी विजेतेपद पटकावले.या सर्व विजयी व सहभागी स्पर्धकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. या सर्व क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक सुहास आडनाईक व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.