
केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांकडून राजापुरातील महिलेची 96000 ची ऑनलाइन फसवणूक.
बँक खात्याची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने व्हॉट्सॲपवर आलेल्या लिंकवर क्लिक केल्याने महिलेच्या खात्यातील पैसे सायबर चोरट्याने काढून घेतले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, राजापूर शाखेतील खातेदार असलेल्या जुवेकर यांच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी तब्बल ९६ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने लंपास केले. याशिवाय याच शाखेतील इतर तीन खातेदारांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जुवेकर यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी श्रीमती जुवेकर यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरील व्यक्तीने बँक अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्या बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे आहे, असे सांगितले. त्यासाठी व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवत असल्याचे सांगून त्यावर क्लिक करून माहिती अपडेट करण्यास सांगितले.
जुवेकर यांनी त्या लिंकवर क्लिक करताच, काही वेळातच त्यांच्या एका खात्यातून ६५ हजार रुपये आणि दुसऱ्या खात्यातून ३१ हजार रुपये, असे एकूण ९६ हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वर्ग झाल्याचा मेसेज त्यांना आला.आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनुष्का जुवेकर यांनी तातडीने राष्ट्रीय सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवली व त्यानंतर राजापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.
दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्रच्या राजापूर शाखेशी संपर्क साधला असता, जुवेकर यांच्याव्यतिरिक्त अन्य तीन खातेदारांच्या खात्यातूनही अशाच प्रकारे रक्कम काढण्यात आल्याच्या तक्रारी बँकेकडे प्राप्त झाल्याची माहिती शाखा अधिकाऱ्यांनी दिली. बँकेनेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून पोलिसांच्या सायबर शाखेकडे या फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली असल्याचे सांगण्यात आले.