
बीएसएनएलच्या ग्रामीण भागातील सेवेवरून राजापूर लांजाचे आ. किरण उर्फ भैया सामंत यानी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली
राजापूर लांजाचे आ. किरण उर्फ भैया सामंत यांनी ग्रामीण भागातील बीएसएनएलच्या ढिसाळ सेवेबाबत प्रश्न उपस्थित करून बीएसएनएलच्या अधिकार्यांना फैलावर घेतले. बैठकीला आला म्हणजे चहा-पाण्यासाठी बोलावले नाही, असेही त्यांनी अधिकार्यांना फटकारले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये बीएसएनएलच्या प्रश्नाबाबत झालेल्या बैठकीत अधिकार्यांना धारेवर धरले. आ. सामंत यांच्याकडे राजापूर, लांजा, साखरपा, रत्नागिरी आदी तालुक्यातून बीएसएनएलच्या नेटवर्कच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. त्या तक्रारीच्या अनुषंगाने बीएसएनएलच्या अधिकार्यांना संपुर्ण माहिती घेऊन बैठकीला बोलावण्यात आले होते. बीएसएनएलची दर्जेदार सेवा देण्यामध्ये काय अडचणी आहेत, हे जाणून घेण्यासाठी बैठक होती. परंतु केंद्र शासनाची ही एजन्सी असल्याने स्थानिक अधिकारी तक्रारींचा विचार करत नाही.
जिल्हा प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींना किमत देत नाहीत, असा एकुण सूर होता. अधिकार्यांकडून उत्तरे मिळत नसल्याने व माहितीही अपूर्ण असल्याने आ. किरण सामंत यांनी त्यांना चांगलेच सुनावले. गावागावांमध्ये बीएसएनएलची रेंज नसल्याने काय काय अडचणींना लोकांना सामना करावा लागतो, माहित आहे का, याचा विचार कधी केला आहे का, अतिशय बेजबाबदारपणाने तुमचे वागणे आहे. ग्रामीण भागात लोकांना फोन वर नातेवाईकांशी बोलताना झाडावर चढण्याची वेळ येतेे. विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास होत नाही.
रेशन दुकानावर रेंज नसल्याने सामान्य लोकांना धान्य मिळत नाही, आरोग्याच्या सुविधांसाठी अनेक अडचणी येत आहेत. लांजा-राजापूर विधानसभेचा आमदार मी आहे. आमच्या तक्रारींची दखल घेतली नाही, जनतेचे प्रश्न सोडविले नाही तर गाठ माझ्याशी आहे. आठ दिवसांमध्ये संपूर्ण माहिती घेऊन पुन्हा बैठक घेतली जाईल. सुधारणा झाली तर ठिक, नाही तर बीएसएनएलच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा सज्जड इशारा आमदार किरण सामंत यांनी दिला. त्याचप्रमाणे या अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावा, अशा सूचना जिल्हाधिकार्यांना दिल्या