जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद जिल्ह्यात 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. 9 : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत जिल्ह्यात 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक होणार आहे. रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब बनत चालली आहे. पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प तसेच पर्यटन प्रकल्पासाठी महिलांनी आता पुढे आले पाहिजे, असे आवाहन उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

येथील स्वयंवर मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर, राहूल पंडित, महेश म्हाप, सुदेश मयेकर, कांचनताई नागवेकर आदी उपस्थित होते.

उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले, स्थानिक उद्योजकांच्या माध्यमातून 1 हजार 37 कोटींचे सामंजस्य करार आज झाले. यात प्रामुख्याने लोटे परशुराम येथे सुप्रिया केमिकल्स 550 कोटी गुंतवणूक करणार आहे. एमएसएमईच्या माध्यमातून 500 कोटी गुंतवणुकीचा समावेश आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 115 टक्के उद्दिष्ट पूर्ण करत जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे. सबसिडी देण्याचे प्रमाण 98 टक्के आहे. मागच्या वर्षी 1 हजार कोटींचे विस्तारिकरण झाले त्यातील 700 कोटींची अंमलबजावणी झाली असून, 300 कोटींची वर्षभरात अंमलबजावणी पूर्ण होणार आहे. परकीय गुंतवणुकीसाठी दावोसला तीन वेळा गेलो. रेड कार्पेट ही संकल्पना पुढे आणली. 96 हजार कोटींची राज्यात गुंतवणूक झाली. सीएमईजीपी योजनेत 117 टक्के विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने कर्ज मंजूर करुन सर्वात चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेनेही चांगली कामगिरी केली आहे, असे सांगून उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले, रत्नागिरीत सेमीकंडक्टर, डिफेन्स क्लस्टर असे मोठे प्रोजेक्ट आले आहेत.‍

निवेंडी, वाटद याठिकाणीही एमआयडीसी येतेय. यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यासाठी युवकांनी आवश्यक ते प्रशिक्षण घ्यावे. स्थानिकांना रोजगार आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे. ही भावना शासनाची आहे. उद्योग कुठेही गुजरातला गेले नाहीत, ते रत्नागिरीत आले आहेत. रत्नागिरी आता उद्योग हब बनत चालली आहे, असेही उद्योगमंत्री म्हणाले.

महिला बचत गटांनी ट्युरिझमसाठी पुढे यावे, स्वयंपूर्ण व्हावे या भावनेतून त्यांना 4 टुरिस्ट वाहने दिली आहेत. आणखी 10 वाहने अजून देणार असल्याचे सांगून उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले, हाऊस बोट प्रकल्पामध्येही महिलांनी सहभागी व्हावे. स्थानिक रोजगार निर्मितीसाठी चांगल्या पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्पांसाठी महिलांनी पुढे यावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अजिबात बंद होणार नाही, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली. श्री. अजगेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात सीएमईजीपी, पीएमईजीपीच्या लाभार्थ्यांना कर्ज वितरण पत्र देण्यात आली. त्याचबरोबर सीएमईजीपी मध्ये 100 टक्के उद्दिष्ट प्राप्त करणाऱ्या बँकांचाही यावेळी स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. महिला बचत गट उमेदअंतर्गत फूड ॲण्ड फ्रूट प्रोसेसिंग क्लस्टर चिपळूण, फिश प्रोसेसिंग क्लस्टर दापोली, गारमेंट क्लस्टर चिपळूण या तीन औद्योगिक समुहाकरिता 15 लाखांचा निधी वितरीत करण्यात आला. या तीन औद्योगिक समुहांसोबत 10 कोटींचे एमओयू करण्यात आले. या परिषदेला बँकर्स, गुंतवणूकदार, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button