
आता आधार कार्ड स्वतःजवळ ठेवण्याची गरज नाही! नवीन आधार अॅपचा तुम्हाला असा होणार फायदा? घ्या जाणून!
: सध्या आधार कार्ड प्रत्येक कामासाठी गरजेचे आहे, असे म्हणायला हरकत नाही. अगदी नोकरीवर रुजू होताना ते अगदी बँकेची ठरावीक कामे करतानाही आधार कार्ड मागितले जाते. पण, आपल्याकडून अनेकदा हे महत्त्वाचे कागदपत्र गहाळ होते. पण, आजची बातमी वाचून तुमचे हे टेन्शन कमी होईल एवढे तर नक्कीच…
आधार कार्ड अधिक सुलभ आणि सुरक्षित बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी बहुप्रतीक्षित आधार ॲप लाँच केले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी एक्स (ट्विटर)वर स्पष्ट केलेय की, नवीन ॲप, फेस आयडी ऑथेंटिकेशन व आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) यांचे संयोजन करून भारतीय नागरिकांना मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे डिजिटल आधार सेवा प्रदान करण्यात येणार आहे.युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)च्या सहकार्याने तयार केलेल्या या अॅपमध्ये क्यूआर कोड आधारित इन्स्टंट व्हेरिफिकेशन आणि ऑथेंटिकेशनसाठी रिअल टाइम फेस आयडीची सुविधा आहे. त्यामुळे लोकांना प्रत्यक्ष फोटो कॉपी किंवा कार्ड बाळगण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे आधार कार्डाची पडताळणी करणे आता यूपीआय पेमेंट करण्याइतके सोपे झाले आहे, असे वैष्णव यांनी एक्स (ट्विटर)वरील पोस्टमध्ये सांगितले आहे.
आधार अॅपच्या आगमनानंतर युजर्सना प्रवास, हॉटेल चेक इन किंवा अगदी खरेदी करताना आधार कार्ड जवळ बाळगण्याची किंवा त्याची झेरॉक्स प्रत देण्याची आवश्यकता राहणार नाही. या अॅपची लवकरच चाचणी होईल आणि देशभरात मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जाईल. नवीन अॅपमुळे व्यक्तींना त्यांच्या आधार कार्डची प्रत्यक्ष झेरॉक्स दाखवण्याऐवजी क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्यांची ओळख पडताळून पाहता होईल .या आधार अॅपमुळे हॉटेल रिसेप्शन, दुकाने किंवा प्रवासादरम्यान आधार कार्डाची झेरॉक्स देण्याची आवश्यकता नाही.
हे अॅप १०० टक्के डिजिटल व सुरक्षित आहे आणि युजर्सच्या संमतीनेच त्यातील माहिती शेअर करता येते. नवीन आधार अॅपसह युजर्सना फक्त आवश्यक डेटा शेअर करण्याची परवानगी असेल, ज्यामुळे ते त्यांच्या वैयक्तिक माहितीवर पूर्ण नियंत्रण ठेवता येईल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले आहेत.
फेस आयडी आधारित प्रमाणीकरणाव्यतिरिक्त नवीन आधार अॅपमध्ये क्यूआर कोड पडताळणी फीचरदेखील असेल, ज्यामुळे आधार पडताळणी जलद आणि अधिक कार्यक्षम होईल.ज्याप्रमाणे भारतातील जवळजवळ प्रत्येक पेमेंट पॉइंटवर यूपीआय पेमेंट क्यूआर कोड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे आधार पडताळणी क्यूअर कोडदेखील लवकरच ‘प्रमाणीकरण बिंदूंवर’ (points of authentication) उपलब्ध होतील.नवीन आधार अॅप वापरून लोक फक्त क्यूआर कोड स्कॅन करू शकतात आणि त्यांचा चेहरा त्वरित पडताळला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे हा आयडी सुरक्षितपणे एखाद्या व्यक्तीच्या फोनवरून शेअर केला जातो; फोटो कॉपीवरून नाही.