
राजरत्न प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी. मानसिक रुग्ण महिला उपचारासाठी दाखल.
रत्नागिरी : येथील राजरत्न प्रतिष्ठान या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थेने ६ एप्रिल रोजी शहरातील मारुती मंदिर परिसरातून महिला मानसिक रुग्ण उपचारासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केली. या संस्थेने आत्तापर्यंत १९८ मानसिक रुग्ण आपण उपचारासाठी दाखल केले आहेत.शहरातील मारुती मंदिर परिसरात कित्येक महिने एक मानसिक महिला रुग्ण मारुती मंदिर ते एसटी स्टँड डोक्यावर मळलेली बॅग, केसाच्या जटा झालेल्या, अंगावरती मळलेले कपडे घालून फिरत होती. या मानसिक रुग्ण महिलेने रविवारी मारुती मंदिरात जाऊन पूजेच्या साहित्याची नासधूस केली.

याबाबतची माहिती काही जागरूक नागरिकांनी पोलिसांनी दिली. या घटनेची कल्पना पोलिसांकरवी त्वरित राजरत्न प्रतिष्ठानला देण्यात आली.यानंतर या महिलेला ताब्यात घेऊन मेडिकल करून पोलिसांच्या मदतीने मनोरुग्णालयात दाखल केले; परंतु ही महिला थोडी आजारी असल्याने तिला प्रतिष्ठानने जिल्हा रुग्णालयात येथे उपचारासाठी दाखल केले आहे. ती पूर्ण बरी झाल्यानंतर या महिलेला पुन्हा मनोरुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. पोलिसांनी या महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेतला असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात या महिलेसोबत ठेवण्यात आले आहे.यावेळी राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष रूपेश सावंत, खजिनदार संतोष (बॉण्ड) सावंत, सभासद अनिरुद्ध (छोटू) खामकर, सभासद अनिल पवार तसेच शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस सौ. सोनल शिंदे व केतन साळवी यांनी मदत केली.




