
काजू गोळा करायला गेला अन् हत्तीनं पायाखाली चिरडलं; सिंधुदुर्गात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
हत्तीने पायाखाली चिरडल्याने दोडामार्ग, सिंधुदुर्ग येथे ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतकरी काजू गोळा करण्यासाठी गेला असता मंगळवारी (०८ एप्रिल) सकाळी सात वाजता ही घटना घडली.लक्ष्मण गवस (७०, रा. मोर्ले, दोडामार्ग) असे हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लक्ष्मण सकाळी सात वाजता काजू बागायतीत काजू गोळा करण्यासाठी गेले असता, हत्तीच्या हल्ल्याचे शिकार ठरले. हत्तीने लक्ष्मण यांना पायाखाली चिरडल्याने त्यांच्या बरगड्या मोडल्या आणि यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच वन्यविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा केला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा हत्तीच्या सुरु असलेल्या उपद्रवाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रानटी गवे, हत्ती, तरस, बिबट्या अशा वन्यजीवांचा परिसरात वावर वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.