
चिपळूण नगर परिषदनव्या इमारतीसाठी तीस कोटींचा प्रस्ताव : शेखर निकम
चिपळूण नगर परिषद डिसेंबर महिन्यात १५० वर्षे पूर्ण करत असून या ऐतिहासिक टप्प्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेची सुसज्ज नवी इमारत उभारण्यासाठी तीस कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या निधीला येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळेल, असा विश्वास चिपळूण–संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.
गुरुवारी नगर परिषदेत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार निकम यांनी ही माहिती दिली. या वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, पाणीपुरवठा विभागाचे श्री. रोहित खाडे, आरोग्य विभागाचे सुजित जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, योगेश पवार, खालिद दाभोळकर आदी उपस्थित होते.
आमदार निकम म्हणाले की, “नग रपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त बहादूर शेखनाका ते चिंचनाका या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरण होणे अत्यावश्यक आहे. या कामासाठी प्रयत्न सुरू असून शासन स्तरावर पाठपुरावा केला जात आहे.”
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आगामी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने चिपळूणला येत असून, त्यांची जनसभा होणार नसली तरी ते सर्वसामान्य नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. “शहरातील रखडलेले प्रकल्प, तसेच आवश्यक असणाऱ्या विकास कामांबाबत आपण उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मुद्दे मांडणार आहोत,” असे आमदार निकम म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “शंकरवाडी येथे बांधण्यात आलेल्या नलावडा बंधाऱ्यामुळे शहरात पुराचे पाणी शिरण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. मोडक समितीचा अहवालही आता मान्य झाल्याने पूरमुक्तीसाठी विविध उपाययोजनांचा मार्ग मोकळा झाला आहे. पाटबंधारे विभागाकडे २३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यालाही मंजुरी मिळेल असा विश्वास आहे.”
आपल्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्या वर्षात शहरासाठी मोठ्या प्रमाणात नवा निधी आणता न आल्याची कबुली देतानाच, “यापूर्वी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मिळवून दिला आहे. त्या कामांचा वेगाने अंमल सुरू आहे,” असे आमदार निकम यांनी स्पष्ट केले.
पवन तलाव मैदानाचे सुशोभीकरण सुरू असून, त्या परिसरातील इमारतींचे पुनर्विकास आणि कुटुंबांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पेठमाप–मुरादपूर पुलासाठी एकूण १८ कोटी रुपयांचा निधी मिळवून दिल्याचे आमदार निकम यांनी सांगितले. सामाजिक सभागृहांसह शहरातील विविध मैदानांचे आधुनिकीकरण सुरू असून गोवळकोट, पवन तलाव, उक्ताड ही तिन्ही मैदाने नव्याने विकसित केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रॅव्हिटी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, शहराच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व योजना पुढे नेण्याचा आपला निर्धार असल्याचे निकम यांनी सांगितले.



