अंगणवाडी सेविकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी बैठक घ्यावी शालेय पोषण आहारात निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि.7 : शासनाच्या विविध निर्णयांची कोटेकोर अंमलबजावणी गावागावात अंगणवाडी सेविका प्रमाणिकपणे करीत असतात. त्यांच्यामुळेच शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचत असतात आणि यशस्वी होतात. अशा अंगणवाडी ताईंच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी,असे सांगतांनाच शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. अंगणवाडी सेविकांच्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठक झाली.

बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, अंगणवाडी सेविकांवर अन्याय होणार नाहीत, याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. त्यांना नाहक त्रास होईल, असे निर्णय जिल्हास्तरावर होता कामा नये. त्यांच्या सुट्टीच्या बाबतीत या जिल्ह्याची भौगोलिक रचना, येथील धार्मिक सण यावर आधारित शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. ठेकेदारांनी जर निकृष्ट धान्य पुरविले असेल तर त्याचे खापर तसेच सगळा रोष अंगणवाडी सेविकांवर येतो. याची तपासणी करुन अशा निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत. नवीन अंगणवाडी इमारत बांधताना जिल्हा परिषदेने प्रथम शासकीय जागेची निवड करावी. त्याबाबतचा प्रस्तावा महसूल यंत्रणेशी चर्चा करुन करावा. रिक्त पदांसाठी नवीन भरती करत असताना पुर्वीच्या एकाही अंगणवाडी सेविकांना काढून टाकले जाणार नाही, असे पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले.

*’नाम’च्या माध्यमातून गाळ काढण्याची मोहीम हाती घ्या* जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्यासंदर्भातही आज पालकमंत्री डाॕ सामंत यांनी आढावा बैठक घेतली. ते म्हणाले, जलसंधारण, जलसंपदा आणि यांत्रिकी विभागाने नद्यातील गाळ काढण्याच्या संदर्भात नियोजन करावे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नद्यांमधील गाळ काढावा. वाशिष्टी नदीसाठी साडेसात कोटी मंजूर आहेत. त्याचे काम सुरु करा. धामणसे येथेही गाळ काढण्याबाबत सुरुवात करावी. अन्य ठिकाणचा आराखडा तयार करावा. नाम फाऊंडेशनही यंत्रणा राबवून गाळ काढण्याच्या कामकाजाला सुरुवात करावी.00

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button