
नितेश राणेंच्या हस्ते कुलाब्यातील जेट्टी प्रकल्पाचे भूमिपूजन, राहुल नार्वेकरांसह स्थानिकांचा विरोध.
गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब दरम्यान मुंबई मेरीटाईम बोर्डाकडून 229 कोटी रुपये खर्चून कुलाबा जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र आता या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांसह भाजप नेते आणि स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांनी विरोध केला आहे.तसेच माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी देखील जोरदार विरोध दर्शविला आहे. हा प्रकल्प कुलाबा येथे न करता समुद्राच्या इतर कोणत्याही भागात करा, अशी स्थानिकांची मागणी आहे.
या प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडलं. त्यामुळे आता भाजपचे मंत्री आणि भाजपचे स्थानिक आमदार यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे.या जेट्टी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्यासाठी कुलाबा येथे मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक काळ्या रंगाचे कपडे परिधान करून एकत्रित जमलेले पाहायला मिळाले. यावेळी आमदार राहुल नार्वेकर यांनी स्थानिकांना संबोधित केले आणि त्यांना आश्वासित केले. कुलाबा येथील नागरिक फक्त आंदोलनावर थांबणार नाही तर मुंबई उच्च न्यायालयात या प्रकल्पाच्या विरोधात याचिका देखील दाखल करणार आहेत.