
नाणीजक्षेत्री श्रीराम जयजयकारात जन्मोत्सव सोहळा.
नाणीज, दि. ५: प्रभू श्रीरामाचा जय जयकार करीत आज नाणीजक्षेत्री श्रीराम जन्मोत्सव सोहळा चैतन्यदायी वातावरणात झाला. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती.आज मध्यान्ही बारा वाजता जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांच्या उपस्थितीत गुरुमाता सौ. सुप्रियाताईंच्या हस्ते बाळ श्रीरामाला सुशोभात पाळण्यात घालण्यात आले. याप्रसंगी नाणीज पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज, सौ.ओमेश्वरी ताई उपस्थित होत्या. सर्वांनी बाळ श्रीरामाची पूजा केली. यावेळी पाळणा म्हटला गेला. पाळण्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रसाद, महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. श्रीरामाचा जयजयकार करीत सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला.दिवसभरात चरण दर्शन, धर्मक्षेत्र मासिकाची उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा सत्कार झाला. महामृत्युंजय यागाची समाप्ती झाली. रात्री प्रथम प.पू. कानिफनाथ महाराज यांचे अमृतमय प्रवचन झाले. त्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन झाले. त्यांनी प्रभू श्रीरामाच्या गुणांची वैशिष्ट्ये सांगितली.
त्यानंतर देवाला साकडे घालून वारी उत्सवाची सांगता झाली.आज पहाटेपासून तर भाविकांचे अक्षरशः लोंढे सुंदरगडावर येत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह, आनंद, श्रध्येचे भाव होते. प्रभू श्रीराम आणि जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे आशीर्वाद असा दोहोंचा मिलाफ येथे भक्ताना अनुभवता आला.आज सायंकाळी पाच वाजता मोफत आरोग्य शिबिराची सांगता झाली. सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज हॉस्पिटलमध्ये गेले दोन दिवस नामवंत डॉक्टर भक्त रुग्णांची तपासणी व उपचार करीत आहेत. दोन दिवस २४ तास महाप्रसाद सुरू होता. त्याचा लाभ भाविकानी घेतला