
गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीने दोन दिवसात २ टन बी खरेदी केली.
गुणवत्तेनुसार शेतकऱ्यांकडील काजू बी ला दर आकारून गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीने दोन दिवसात २ टन बी खरेदी केली आहे.तसेच ठरलेली रक्कम शेतकऱ्याच्या थेट बँकखात्यात जमा केली जात असल्याचे कंपनीचे मुख्याधिकारी मंदार जोशी यांनी सांगितले. शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी हा प्रयोग केल्याचेही त्यांनी सांगितले.
काजू बागायतदारांना गुणवत्तेनुसार १०० ते १५० रुपये प्रतिकिलोने काजू बीला दर मिळाला आहे. या प्रक्रीयेमुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होत होत आहे. कंपनीकडून जीएसटी पावती दिली जात असल्याने शासनाकडून मिळणाऱ्या काजू बी अनुदानासाठी बागायतदार पात्र ठरू शकतो. तसेच शेतकऱ्यांना काजू बी उत्पन्नवाढीसाठी प्रशिक्षणाची मोफत व्यवस्था केली गेली आहे. त्यामुळे दलाली, कमिशन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याशिवाय या व्यवहाराचा फायदा किसान क्रेडिट कार्डसाठी (शेती कर्ज) होणार आहे. याबाबत काजू बागायतदार संजय गमरे म्हणाले, गावोगावी येणारे फिरस्ते काजू बी खरेदी करतात. त्यातून शेतकऱ्याला योग्य दर मिळत नाही. याउलट कंपनीत चांगल्या दरात काजू बी विकता येत आहे.