
पोरबंदर एक्स्प्रेसमध्ये चोरी ; चोरट्याविरुद्ध गुन्हा.
रत्नागिरी ः कोकण रेल्वेच्या पोरबंदर सुपरफास्ट एक्स्प्रेने प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेची सॅक व मिनीपर्स चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३१ मार्च ला सकाळी साडे आठच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान निदर्शनास पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला ही पोरबंदर एक्स्प्रेसने मडगाव ते पनवेल रेल्वेस्टेशन असा प्रवास करत होती. त्यांनी त्यांची सॅक व त्यामध्ये मिनी पर्स असे सीटखाली ठेवले होते. त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांची सॅक पळविली. त्यामध्ये दीड हजार रोख रक्कम, ५ हजार ८४९ रुपयांचा मोबाईल तसेच १० रुपयांची मिनी पर्स, एटीएम कार्ड असा ७ हजार ३६९ रुपयांचा मुद्देमाल होता. तो चोरट्याने पळविला. या प्रकरणी फिर्यादी महिलेने शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १) तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.