
सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अधोगतीकडे नेण्याचे पाप राणे कुटुंबीय स्वार्थासाठी करत आहेत -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत
सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अधोगतीकडे नेण्याचे पाप राणे कुटुंबीय स्वार्थासाठी करत आहेत असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यानी आज केला आहेतत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिपूर्ण आर्थिक तरतुदींसह सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली होती, तरीही काही जणांनी ते होऊ नये यासाठी प्रयत्न केले.मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याने हे शासकीय महाविद्यालय सुरू होऊ शकले. तथापि, या शासकीय महाविद्यालयाची सध्याची स्थिती बिकट आहे.
महिनाभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थितीमध्ये सुधारणा झाली नाही तर, आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.विनायक राऊत यांनी मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून भाजपा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक तसेच इतर बाबतीत हेळसांड होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या महाविद्यालयानंतर मंजूर झालेली अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व्यवस्थित सुरू असल्याकडे लक्ष वेधतानाच, सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मात्र अधोगतीकडे चालले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. स्वतःचे मेडिकल कॉलेज वाचविण्यासाठी विद्यमान खासदार नारायण राणे यांना हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नकोच आहे आणि त्यासाठीच हे प्रयत्न असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.