मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादमीचे सक्षमीकरण आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

रत्नागिरी, दि. 2 : महाराष्ट्र शासनाने मिशन लक्ष्यवेध या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील खेळाडुंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, क्रीडा वेधकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूना पुरस्कार व प्रोस्ताहन, खेळाडुंकरिता करिअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी विदेशी प्रशिक्षक व संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याचा उद्येश आहे. इच्छुक संस्थांनी अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूंनी ऑलिंम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्याकरिता नियोजनबध्द प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्यातील खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभुत सुविधा, क्रीडा वेद्यकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूंकरिता करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी/विदेशी प्रशिक्षक व संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने “मिशन लक्ष्यवेध” या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या अॕथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शुटींग, सेलींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, कुस्ती या १२ क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खासगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन अशा संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादमींना आर्थिक सहाय्य करावयाच्या दृष्टीने संबंधित अकादमीमधील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभुत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येऊन, ३५ ते ५० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था क वर्ग, ५१ ते ७५ गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ब वर्ग व ७६ ते १०० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था अ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. क वर्ग अकादमींना वार्षिक रू.१०.०० लक्ष, ब वर्ग अकादमींन वार्षिक रु.२०.०० लक्ष न अ वर्ग अकादमींना वार्षिक रु.३०.०० लक्ष आर्थिक सहाय्य, पायाभुत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे इ. बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button