
दहा कोटींचा निधी दिला तरीही कार्यक्रमाला ग्रामस्थ उपस्थित रहात नाही, ही जबाबदारी कोणाची आहे ?मंत्री उदय सामंत यांचा पदाधिकाऱ्यांना सवाल
कोणीतरी येतो, स्पर्धेला पैसे देतो पण तो ना तुमच्या सुखदुःखात येतो किंवा प्रचारात. तरीही त्याला बाराशे मते कशी मिळतात? याचे आत्मचिंतन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे. तुम्ही सांगाल तेवढा निधी माझ्याकडून दिला जातोय. विकासकामात मी मागे रहात नाही; परंतु पदाधिकारी जनतेत पोहोचण्यात कमी पडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. माझे प्रत्येक पदाधिकाऱ्यावर लक्ष आहे, मतदारसंघात नसलो तरीही गावागावात काय चालते, याची पूर्ण माहिती मुंबईत बसून मिळते. त्यामुळे पक्षाचे काम न करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, पक्षाचे संघटन वाढवणार असाल तरच यापुढे तिकीट दिले जाईल, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.तालुक्यातील करबुडे येथे आयोजित विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचीही कानउघडणी केली. ते म्हणाले, विकासनिधी देण्यात मी कोठेही कमी पडत नाही.
तुम्ही सांगाल तेवढा निधी देतो. दहा कोटींचा निधी दिला तरीही कार्यक्रमाला ग्रामस्थ उपस्थित रहात नाही, ही जबाबदारी कोणाची आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विकासनिधीची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. परंतु यामध्ये तुम्ही मागे राहताय. राज्यात कोठेही गेलो तरी चोवीस तासात प्रचंड गर्दी होते. मग आपल्याच मतदारसंघात असे का? प्रत्येकवेळी कारणे देऊन वेळ मारून न्यायची, हे आता चालणार नाही. वर्षभरातला कोणताही महिना घ्या, तुमच्याकडे कारणे तयार असतात. संक्रातीपासून गणपती, होळी, दिवाळी, भाजावळ, भातलावणी आणि काहीच नाही तर मे महिन्यात उन्हाळा असतो, ही तुमची नेहमीची कारणे मला तोंडपाठ झाली आहेत. माझी निवडणूक झाली आहे, आता तुमची निवडणूक आहे यासाठी तुम्हाला काम करावे लागेल. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. जो काम करणार नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाईल. असा इशारा सामंत यांनी दिलाm