गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये ४१ रुपयांची कपात, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांचा मोठा निर्णय!

: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती ४१ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन किमती आजपासून (१ एप्रिल २०२५) लागू झाल्या आहेत.

ऑयल मार्केटिंग कंपन्यांच्या या दर कपातीच्या निर्णयामुळे ढाबे, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून लागू झालेल्या या नवीन कपातीनंतर, मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १७१४.५० रुपये झाली आहे, जी पूर्वी १७५५.५० रुपये होती. तर, कोलकातामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १८७२ रुपये झाली आहे, जी पूर्वी १९१३ रुपये होती. चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता १९२४ रुपये झाली आहे, जी पूर्वी १९६५ रुपये होती. दरम्यान आता दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १७६२ रुपये झाली आहे. जी या कपातीपूर्वी १८०३ रुपये होती.

दरम्यान घरगुती १४.२ किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. १४.२ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत ८०३ रुपये, कोलकातामध्ये ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये आहे.

ऑयल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल करतात. कंपन्या गरजेनुसार गॅस सिलिंडरच्या किमती वाढवतात किंवा कमी करतात. या कंपन्यांनी गेल्या महिन्यात १ मार्चपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ६ रुपयांची वाढ केली होती. पण आता या महिन्याच्या सुरुवातीला त्यामध्ये ४१ रुपयांची कपात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button