
रत्नागिरी, रायगड आणि मावळ या तीनही मतदारसंघांवर भाजपचा दावा-गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
रत्नागिरी, रायगड आणि मावळ या तीनही मतदारसंघांवर भाजपचा दावा आहे, असे उद्गार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.आपण कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दौरा करत आहोत. कार्यकर्त्यांच्या मनातली भावना मी बोलून दाखवली आहे आणि ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.भाजपने तिन्ही मतदारसंघांवर दावा केल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी लोटे येथील आपल्या सभेपूर्वी भाजपला फटकारले होते. रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघ शिवसेनेचा आहे. भाजपला सगळ्या पक्षांना संपवून एकट्यालाच शिल्लक राहायचे आहे का, असा प्रश्न रामदास कदम यांनी केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली असता मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, कोणी काय आरोप केले आहेत यात मी जात नाही. मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आणि भाजपचा प्रचार करण्यासाठी आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, ते मी मांडले आहे आणि ते मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवेन.भाजपने लोकसभेच्या आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही, या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राची बैठक अजून झालेली नाही. ती झाल्यानंतर दुसरी यादी जाहीर होईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश असेल. असे त्यांनी सांगितलेwww.konkantoday.com