गुंतवणूक केलेल्या रकमेचा गैरव्यवहार व अपहार करून तब्बल ५६ लाखाची फसवणूक करून गेली दोन वर्षे पसार असलेल्या संस्थेच्या सूत्रधाराला अटक.

ठेवीदार, सभासद यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेचा गैरव्यवहार व अपहार करून तब्बल ५६ लाखाची फसवणूक करून गेली दोन वर्षे पसार असलेल्या सावर्डे येथील शिवनेरी बळीराजा नागरी सहकारी पतसंस्थेचा संस्थापक व मुख्य प्रवर्तक अमोल अनंत साटले (पालवण) अखेर गजाआड झाला आहे. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने साटले याच्या नवी मुंबईतून मुसक्या आवळत चिपळुणात आणले. येथील न्यायालयात त्याला हजर केले असता १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सावर्डे येथील शिवनेरी बळीराजा नागरी सहकारी पतसंस्थेचा संस्थापक व मुख्य प्रतर्वक म्हणून अमोल साटले होता. असे असताना साटले याने पतसंस्थेमधील ठेवीदार, सभासद यांनी गुंतवणूक.केलेल्या रकमेचा गैरव्यवहार व अपहार करून पतंस्थेच्या ठेवीदार, सभासदाचे ५६ लाख ६३ हजार रुपये रक्कमेची फसवणूक केली होती. या प्रकरणी साटले याच्यावर सावर्डे पोलीस ठाण्यात ३१ मार्च २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विशेष म्हणजे साटलेसह सचिव, खजिनदार व संचालक अशा एकूण ११ जणांचा समावेश होता. या बाबतची फिर्याद श्रीया झगडे (लेखा परीक्षक, सहकारी संस्था) यांनी दिली होती. मुख्य सूत्रधार अमोल साटले याच्यावर गुन्हा दाखल होताच तो गायब झाला होता. त्याचा पोलिसांनी शोध घेतला असता तो सापडला नव्हता. त्याचा शोध सुरू असतानाच रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला नुकतेच नवी मुंबईतून ताब्यात घेत अटक केली. न्यायालयाने त्याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button