
अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचा ९२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
*रत्नागिरी -* अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ (रत्नागिरी) चा ९२ वा वर्धापनदिन सोहळा गुरुवार, २७ मार्च २०२५ या दिवशी सायंकाळी मंडळाच्या श्री भगवान परशुराम सभागृहात उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. प्रज्ञा गोखले, तसेच मंडळाचे संस्थापक बाळाजी हरी मराठे यांचे नातू सीए आणि निवृत्त प्राध्यापक श्रीकांत मराठे, मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती स्मिता परांजपे, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, सहकार्यवाह अनंत आगाशे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
एखादी संस्था ९२ वर्षे एकाच ध्येय धोरणाने चालवणे आणि त्यासाठी पिढी दर पिढीत तितकेच प्रामाणिक कार्यकर्ते निर्माण करणे, संस्थेच्या यशाची आणि योगदानाची कमान अधिकाधिक मोठी करणे ही फार मोठी गोष्ट आहे. फार मोठे देश कार्य या संस्थेच्या माध्यमातून होवो, असे गौरवोद्गार शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. सदानंद भागवत यांनी काढले. त्यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
इलेक्ट्रिकल इंजिनिअर विभागात डॉक्टरेट मिळवल्याबद्दल प्रमुख पाहुण्या डॉ. प्रज्ञा गोखले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अत्यंत हलाखीची स्थिती, अडचणी असूनही मंडळाचे कार्यवाह श्री. राजेंद्र पटवर्धन यांनी वेळोवेळी मंडळाच्या माध्यमातून केलेल्या आर्थिक मदतीमुळे यश गाठू शकले, असे कृतज्ञतापूर्ण उद्गार डॉ. गोखले यांनी काढले.
प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका अन् दिग्दर्शिका आणि कृषी उद्योजिका सौ. संपदा जोगळेकर-कुळकर्णी म्हणाल्या की, मंडळाच्या ९२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा आदर्श घेऊन आम्हालाही समाजोपयोगी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. सौ. संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांना तसेच विश्व हिंदू परिषदेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि राम जन्मभूमी लढ्यात सहभाग घेतलेल्या सौ. सुवर्णा वैशंपायन, आयुर्वेद कंपनीच्या सीईओ राजापूरच्या डॉ. नेहा करंदीकर-जोशी यांना (कै.) सुधा वसंत बडे पुरस्कार देण्यात आला. ‘शालेय संस्कृत व्याकरण’ पुस्तकाच्या लेखिका आणि संगीत विशारद सौ. दीप्ती आगाशे यांना संस्कृतप्रेमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
इयत्ता पाचवीत शिकणारी गिर्यारोहक कु. ग्रिहिथा विचारे (मुळची गुहागर येथील, सध्या सरस्वती विद्यालय, घोडबंदर, ठाणे) आणि आतापर्यंत १२५ गडकिल्ले सर करत निसर्ग भटकंती करणारे प्रथमेश वालम (पडवे, राजापूर) यांना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार देण्यात आला. गुरुवर्य दादोजी कोंडदेव शाळेचा (तासगाव, सांगली) बेस्ट कॅडेट आणि आतापर्यंत २५० गटकोट सर करत गडसंवर्धनात हातभार लावणारा कु. सार्थक पाटील याला समशेरबहाद्दर पुरस्कार देण्यात आला.
रत्नागिरीच्या कबड्डी, कुस्ती, शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारात दबदबा निर्माण करणारे ८० वर्षांचे श्रीकृष्ण तथा भाई विलणकर यांना जीवनगौरव पुरस्काराने; तर पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळात ४२ वर्षे सेवा करणारे श्री. धनंजय देशमुख यांना सेवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्य कुटुंबातील पाचव्या सीए सौ. मयुरी वैद्य, सामाजिक कार्यकर्त्या शुभदा साठे, कोतवडे येथे गावी राहून फक्त ऑनलाइन मार्गदर्शनाद्वारे सीए झालेले संकेत परांजपे यांना सन्मानित करण्यात आले.
हिंदु समाजाच्या जनजागृतीसाठी अनेक वर्षे तळमळीने कार्य करणाऱ्या सकल हिंदु समाजाचे संजय जोशी, राकेश नलावडे, चंद्रकांत राऊळ, यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. मंडळाच्या वसतीगृहात झालेल्या उपासनेच्या सुसंस्कारांमुळे पुढील आयुष्याला चांगले वळण लागल्याचा अनुभव श्री. संजय जोशी यांनी उधृत केला.
वर्धापनदिनी ७५ वर्षे पूर्ण झालेल्या मंडळाच्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. मंडळाच्या कै. ल. वि. केळकर विद्यार्थी वसतीगृहातील कु. अमोल मुळ्ये याचा आदर्श विद्यार्थी म्हणून आणि कै. आनंदीबाई त्रि. केळकर विद्यार्थिनी वसतीगृहातील कु. आर्या दाते हिचा आदर्श विद्यार्थिनी म्हणून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे कार्यवाह श्री. राजेंद्र पटवर्धन यांनी; तर सूत्रसंचालन सौ. पूर्वा साने यांनी केले.