
कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी.
कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांचे आवाहन
रत्नागिरी : नागरिकांनी समुद्रावर जाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोणीही खोल समुद्रात जाऊ नये आणि स्वतःचा जीव आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये. मद्यपान करून समुद्रावर गाडी चालवू नये आणि अति उत्साही पर्यटकांनी समुद्रांवर जाताना विशेष काळजी घ्यावी तसेच तिथे असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, महिलांनी विशेष काळजी घेऊनच समुद्रात जावे, अशा सूचना कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे आणि रत्नागिरी पोलीस दल यांच्याकडून करण्यात आले आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या आता सुरू झाल्या असून कोकणात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतेच रत्नागिरीत आलेले संजय दराडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नागरिकांना आवाहन केले. घाटमाथावरून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे विशेष आकर्षण असते. पाण्या त उतरल्यानंतर भान न राहिल्याने बऱ्याच जा दुर्घटना घडतात. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे श्री. दराडे यांनी सांगितले.
समुद्रावर असणाऱ्या महिलांना कोणी त्रास दिला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. समुद्रावर कोणी अतिउत्साही व्यक्ती आढळली, तर ११२ या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना तात्काळ कळवावे, असे आवाहन कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी केले आहे.




