
शिरगावचा तत्कालीन ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे आदेश
बांगलादेशी व्यक्तीला कोरोनाच्या कालावधीमध्ये शिरगाव ग्रामपंचायतीमधून दाखला दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची चौकशी जिल्हा परिषदेमार्फत चालू असून, तत्कालीन ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिली.कोरोनाच्या कालावधीत आपत्कालीन व्यवस्थापना व्यतिरीक्त प्रशासकीय काम थांबलेले असतानाही कोणतेही चौकशी न करता बांगलादेशी व्यक्तीला कोणत्या पध्दतीने दाखला देण्यात आला, याची चौकशी जिल्हा परिषदेमार्फत सुरु करण्यात आली आहे.
हा दाखला दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने भारतीय नागरिकत्वाबाबतची कोणती कागदपत्रे तयार केली आहेत का यासह आधार कार्ड व अन्य कागदपत्रे तयार केलीत का याचीही चौकशी केली जाणार आहे. बांगलादेशी व्यक्तीकडे असणारा मोबाईल कशापध्दतीने त्याने मिळवला याचीही चौकशी पोलीस यंत्रणा करणार आहे.याप्रकरणात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संबंधित ग्रामसेवकाशी चर्चा केल्यानंतर त्याने चुकून झाल्याचे वरिष्ठांना सांगितल्याची माहितीही अधिकार्यांनी दिली.याप्रकरणात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तत्कालीन ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जात आहे.