
निवती रॉक समुद्रात पर्यटनासाठी स्थापित करण्यात येणारी गुलदार युद्धनौका कुणकेश्वराच्या समुद्रात स्थापित करण्याच्या हालचाली सुरू.
निवती रॉक समुद्रात पर्यटनासाठी स्थापित करण्यात येणारी गुलदार युद्धनौका कुणकेश्वराच्या समुद्रात स्थापित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेतमालवण आणि वेंगुर्ला परिसरात भोगवे, निवती, देवबाग, तारकर्ली, मालवण, तोंडवळी या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटनवाढीस वाव आहे. या भागातील पर्यटनाला जागतिक दर्जा मिळावा यासाठी येथे एखादा नावीन्य पूर्ण प्रकल्प उभारण्यात यावा, अशी येथील पर्यटन व्यावसायिकांची मागील १०-१२ वर्षांपासूनची मागणी होती. याच मागणीचा विचार करता निवती रॉक समुद्रात नौदलाची निवृत्त युद्धनौका स्थापित करून तिथे पाणबुडी प्रकल्प राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली होती.
मागील सहा-सात वर्षे पाठपुरावा केल्यानंतर अखेर नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार आणि पाणबुडी प्रकल्पाला केंद्राने निधीची तरतूद करत हिरवा कंदील दाखविला होता.कुणकेश्वर समुद्रात किनाऱ्यापासून तीन किलोमीटर लांब २० मीटर खोल समुद्रात गुलदार युद्धनौका स्थापित करण्याचे ठरले आहे. यासंदर्भातील एक पत्र महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पाठविण्यात आले आहे.
या पत्रात गुलदार स्थापित करण्याच्या जागेत अंशतः बदल करण्यात आला असून, निवती रॉकऐवजी कुणकेश्वर येथील समुद्रातील जागेची निवड करण्यात आली आहे. असे म्हटले आहे.निवती रॉक समुद्रात राबविण्यात येणारा आणि मागील अनेक वर्षांची मागणी असलेला अंडरवॉटर म्युझियम ॲण्ड आर्टिफिशल रीफ आणि पाणबुडीचा प्रकल्प तडकाफडकी कुणकेश्वरला होणार असल्याची माहिती मिळताच मालवण आणि वेंगुर्ला येथील पर्यटन व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.