
चिपळूण, खेड, संगमेश्वर तालुक्यांतील काही गावांमधून पाण्यासाठी टँकरची मागणी सुरू.
वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक जलस्राेत आटू लागले असून, जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पाेहाेचू लागली आहे. रत्नागिरी तालुक्यातील साेमेश्वर गावात पाणीटंचाई तीव्र झाली असून, यावर्षीचा जिल्ह्यातील पहिला पाण्याचा टँकर तिथे धावला आहे.त्याचबराेबर चिपळूण, खेड, संगमेश्वर तालुक्यांतील काही गावांमधून पाण्यासाठी टँकरची मागणी सुरू झाली आहे.
यावर्षी मोसमी पाऊस लांबल्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी टिकून हाेती. परिणामी जिल्ह्यात पाणीपुरवठा करणारे टँकर उशिराने धावतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एकही टँकर धावलेला नाही. फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणीपातळी वेगाने खालावू लागली असून, ग्रामीण भागामध्ये तसेच डोंगराळ भागातील काही गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट दिसू लागले आहेत.