
ताजे, स्वच्छ, निर्भेळ व दर्जेदार अन्नासाठी तपासणी मोहीम राबवा-जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. 28 : रत्नागिरी हा पर्यटन जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्यांना ताजे, स्वच्छ, निर्भेळ, सकस व दर्जेदार अन्न पदार्थ मिळावेत. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम जिल्हाभरात राबवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज झाली. जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, पर्यटकांच्या, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेल, उपहारगृह, मिठाई आस्थापना, खाद्यपदार्थ विक्री केंद्रं यांची तपासणी मोहीम सुरु करावी. बस स्थानक परिसर, विविध ठिकाणी रस्त्यांलगत अन्न पदार्थ बनवून तेथेच विक्री करणाऱ्या केंद्रांचीही तपासणी करावी. दंडात्मक कारवाई वाढवावी. परिसरातील स्वच्छतेबाबत अन्न नोंदणी परवान्यांबाबत प्रशिक्षण शिबिरांचे आयोजनही करावे.
सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. घेतलेल्या 309 नमुन्यांपैकी 5 अप्रमाणित, अन्न परवाने नोंदणीसाठी एकूण 5 हजार 458 अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी 4 हजार 567 निकाली अर्ज काढण्यात आले आहेत. त्यामधून 1 कोटी 5 लाख 15 हजार 900 रुपये शुल्क जमा झाले आहे. अन्न परवान्याबाबत 90 ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या असून 6 जणांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. तर नोंदणीबाबत 39 ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या असून 1 निलंबन करण्यात आले आहे. प्रतिबंधित अन्न पदार्थ प्रकरणी 4 एफआयआर दाखल करण्यात आल्या असून 2 वाहने जप्त, 6 लाख 77 हजार 160 रुपये किमंतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आदी उपस्थित होते.00