कुणाल कामराला मोठा दिलासा! मद्रास उच्च न्यायालयाने मंजूर केला अटकपूर्व जामीन!

: स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते सादर केल्यानंतर तो वादात सापडला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून शिवेसनेच्या नेत्यांकडून कामरा याला अटक करण्याची मागणी केली जात आहे. यादरम्यान कुणाल कामराने आज (२८ मार्च) मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीनाचा अर्ज मंजूर केला. कामरा याला ७ एप्रिलपर्यंत दिलासा मिळाला आहे. कारण त्याच्या वकिलांनी महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली होती.

न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या खंडपीठाने हा अर्ज मंजूर करताना म्हटले आहे की, कुणाल कामरा यांनी प्राथमिकदृष्ट्या मद्रास उच्च न्यायालयाला खात्री पटवून दिली की तो संरक्षणासाठी महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये जाऊ शकत नाहीत. तसेच न्यायमूर्ती मोहन यांनी असेही निरीक्षण नोंदवले की, या प्रकरणात कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता नाही आणि महाराष्ट्रातील मंत्री आणि पक्षाचे कार्यकर्ते धमक्या देत असल्याने कामरा जामीनासाठी येथील न्यायालयांमध्ये जाऊ शकत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये अंतरिम अटकपूर्व जामीन नंतर मागितला जाईल.दरम्यान या सुनावणीवेळी कामराच्या वकिलांने उच्च न्यायालयाला सांगितले की, त्याला (कुणाल कामरा) ५०० हून अधिक धमक्यांचे फोन आले आहेत. “ते म्हणतात की ते ‘शिवसेना स्टाईलने त्याला धडा शिकवतील’. ‘शिवसेना स्टाईल’ म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे… हॉटेलमध्ये तोडफोड करणाऱ्यांवर कोणतीही गंभीर कारवाई झाली नाही, त्यांना जामिनावर सोडण्यात आले. अशाच प्रकारच्या धोका मला आहे. मी नेहमीच सांगत आलो आहे की माझा संविधानावर विश्वास आहे,” असे कामराच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

कामराच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, त्याच्या स्टँड अप दरम्यान कोणाचेही नाव घेतले नाही आणि अनेक व्यक्तींवर भाष्य केले आहे. कामराने कोर्टात सांगितले की तो मुंबईतून तमिळनाडू येथे २०२१ रोजी स्थलांतरित झाला आणि तेव्हापासून तो याच राज्याचा रहिवासी आहे आणि त्याला मुंबई पोलिसांकडून अटक होण्याची भीती आहे.३६ वर्षीय स्टँड-अप कॉमिडियन कुणाल कामरा याला त्याने त्याच्या शो दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर मुंबई पोलिसांनी दोन समन्स बजावले आहेत.

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने आपल्या शोमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत टीका केली होती. यामध्ये कुणाल कामराने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचा संदर्भ दिला होता. यामध्ये कुणाल कामरा शोमध्ये म्हटलं होतं की, “महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी काय केलं आहे, त्यांना सांगावं लागेल. आधी शिवसेना भाजपामधून बाहेर पडली, नंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडली”, असं म्हणत कुणाल कामराने शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक व्यंगात्मक गाणंही सादर केलं होतं. मात्र, व्यंगात्मक गाणं सादर केल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील कार्यक्रमस्थळाच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच कुणाल कामराच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button