सीएसएमटी येथील कामामुळे ३१ मार्चपर्यंत तेजस, जनशताब्दी एक्स्प्रेस सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत , प्रवाशांची होतेय कसरत

गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट क्रमांक १२, १३ च्या विस्तारीकरणाचे कामे सुरू असून त्यामुळे रेल्वेगाड्यांचा खोळंबा होत आहे.कोकणातून मुंबईत येणाऱ्या तेजस, जनशताब्दी आणि मंगळुरू एक्स्प्रेसच्या थांब्यात बदल करण्यात आला आहे. सीएसएमटी येथील कामामुळे ३१ मार्चपर्यंत तेजस, जनशताब्दी एक्स्प्रेस सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत धावेल.सीएसएमटी येथे फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या अनेक रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल केला आहे. परंतु, हे काम पूर्ण झाल्यानंतर या फलाटावरून २४ डब्यांची रेल्वेगाडी धावू शकेल. सध्या अंतिम टप्प्यातील कामे सुरू असून लवकरच फलाट विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

त्यानंतर रेल्वेगाड्यांची सेवा पूर्वपदावर येईल.परंतु, सध्या सुरू असलेल्या पायाभूत कामांमुळे गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरु ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल. गाडी क्रमांक २२१२० मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून दिली.सीएसएमटीवरील फलाट क्रमांक १०, ११, १२, १३ विस्तारीकरणाचे काम सुरू होते. त्यापैकी सध्या १०, ११ फलाटांचे विस्तारीकरण झाले असून १२, १३ फलाटांचे काम हाती घेतले. संपूर्ण पायाभूत कामे नोव्हेंबर २०२४ पूर्ण करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेने ठेवले होते. परंतु, हे काम इच्छित वेळेत पूर्ण न झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

तेजस, जनशताब्दी यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांची धाव सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत आहे. मंगळुरू एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावते. परिणामी, गेल्या बराच कालावधीपासून अशाप्रकारचे वेळापत्रक लागू असल्याने प्रवाशांना ठाण्यावरून सीएसएमटी गाठणे गैरसोयीचे होते. ठाण्यावरून सीएसएमटीला जाण्यासाठी टॅक्सीने किंवा लोकलने प्रवास करावा लागतो. परंतु, सामान घेऊन प्रवास करणे प्रवाशांसाठी मोठी कसरत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button