
जिल्हा सनियंत्रण समिती आढावा बैठक संस्थांना भेट देऊन मुला-मुलींशी बोलावे, समस्या जाणून घ्याव्यात – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. 27 : बालगृहे चालविणाऱ्या संस्थांना भेटी द्याव्यात. तेथील मुला-मुलांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. संस्था तसेच समितीनेही सकारात्मक राहून त्यांच्याविषयी निर्णय घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची आज आढावा बैठक झाली. बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, जिल्हा कौशल्य विकास सहाय्य आयुक्त इनुजा शेख, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या संस्थेंमधून मुले पळून जात असतील, अशा संस्थांची चौकशी करा. त्यासाठी संस्थांना भेटी देऊन मुला-मुलांशी चर्चा करावी. मुलींना घरी जायचे असेल तर, त्याबाबत समितीने सकारात्मक रहावे. बालसंगोपन योजनेसाठी पालकांना प्रेरीत करावे. आरोग्य, स्वच्छता, व्यायाम, योगा, समाजमाध्यमांविषयी तसेच काय चांगले काय वाईट याबाबत मुलांची जनजागृती करावी. मुलींशी संवाद साधताना जिल्ह्यातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची मदत घ्यावी.
श्री. हावळे यांनी यावेळी विषयवाचन करुन विविध समित्यांबाबत संगणकीय सादरीकरण केले.000