हिंदवी स्वराज्याचे उरलेले कार्य पूर्ण करूया-!शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी


हिंदवी स्वराज्यासाठी, धर्मासाठी छत्रपती संभाजी राजांच्या देहाचे तुकडे झाले तरी ते नमले नाहीत, झुकले नाहीत.ते झुकले असते तर आज काय परिस्थिती असती? आज आपल्यापैकी अनेकांना छत्रपती शिवाजी राजे व संभाजी राजे यांचा पूर्ण इतिहास माहीतही नसेल. जो आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, तो पुढे काय इतिहास घडवणार? त्यासाठी जागे व्हा.. या उभ्या देशात छत्रपती शिवाजी राजे व संभाजी राजे यांचे विचार पोचवूया. या थोर, पराक्रमी राजांचे हिंदवी स्वराज्याचे उरलेले कार्य आपण सर्वांनी पूर्ण करायचे आहे, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी साडवली (देवरूख) येथील उपस्थित शिवप्रेमींना केले.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सकल हिंदू समाज, देवरुख, यांचे वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्ताने सोमवारी सायंकाळी साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल मैदान येथे सर्व हिंदू समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचे व्याख्यान झाले. यावेळी भिडे गुरुजी यांनी छत्रपती शिवाजी राजे व संभाजी राजे यांचे शौर्य व पराक्रम आपल्या शैलीत शिवप्रेमीं समोर मांडला. यावेळी हजारो शिवशंभू प्रेमी उपस्थित होते. भिडे गुरुजी यांनी प्रथम संगमेश्वर कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला भेट दिली. त्याठिकाणी संभाजी राजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करत अभिवादन केले. त्यानंतर साडवली येथील कार्यक्रमांची सुरुवात भिडे गुरुजी यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून करण्यात आली.

यावेळी भिडे गुरुजी शिवकालीन इतिहास सांगताना पुढे म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे निर्माते हे छत्रपती शिवाजी राजे होते. याच स्वराज्यासाठी शिवाजी राजांनी २८९ लढाया लढल्या. तर आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती संभाजी राजे देखील शेवटपर्यंत स्वराज्यासाठी जगले. पाऊणे नऊ वर्षात जवळपास १३४ लढाया संभाजी राजांनी लढल्या. विशेष म्हणजे त्यात त्यांनी एकदाही माघार घेतली नाही. ज्यावेळी छत्रपती संभाजी राजांना संगमेश्वर कसबा येथे पकडण्यात आले. त्यावेळचा प्रसंग भिडे गुरुजी यांनी आपल्या शैलीत मांडला. तो ऐकून उपस्थित शंभूप्रेमींचे डोळे भरून आले. अनेकांच्या अंगावर जणू काटेच उभे राहिले.

जर छत्रपती संभाजी राजे त्यावेळी झुकले असते तर कदाचित त्यांना दिल्लीची बादशाही देखील मिळाली असती. आणि आजची परिस्थिती वेगळी असती, पण झुकणे आणि शरण जाणे त्यांनी कधी पाहिलेच नाही. केवळ स्वराज्यासाठी त्यांनी शरण न जाता मरण स्वीकारले. त्यांचे हे कार्य पुढील पिढी पर्यंत पोचविण्यासाठी शिवजयंती बरोबर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास देखील साजरा केला पाहिजे. हा दिवस म्हणजे या थोर पराक्रमी राजांचे विचार आणि वृत्तीची उपासना करणे होय, असेही भिडे गुरुजी शेवटी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निबंध कानिटकर तर प्रास्ताविक मदन मोडक यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सकल हिंदू समाज देवरुख-साडवलीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button