
मँगो पार्कसाठी निवेंडी तर रिळउंडी एमआयडीसीसाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण , निधीसाठी मागणी मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी तालुक्यात उद्योग येणार
रत्नागिरी जिल्ह्यात विशेषत: रत्नागिरी तालुक्यामध्ये नवनवे प्रकल्प आणण्यात राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे.मँगो पार्कसाठी निवेंडी तर रिळउंडी एमआयडीसीसाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, यासाठी आवश्यक चारशे कोटींच्या निधीची मागणी प्रशासनाने एमआयडीसीकडे केली आहे.
अडीच वर्षांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री पद मिळाल्यानंतर रत्नागिरीमध्ये मँगोपार्क तर दापोलीतील हर्णे येथे फिशपार्क उभारण्याची घोषणा ना. उदय सामंत यांनी केली होती. त्या द़ृष्टीने रत्नागिरी मतदारसंघात निवेंडी येथे मँगो पार्क उभारण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहेत. यासाठी 104 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार असून, त्याची मोजणीही पूर्ण झाली आहे. यासाठी 144.99 कोटी रुपयांची मागणी प्रशासनाने एमआयडीसीकडे केली आहे. या जागेचे अंतिम नोटीफिकेशनही निघाले आहे. याचप्रमाणे रिळउंडी येथेही प्रकल्प उभारला जाणार असून, याठिकाणी 205 हेक्टर जागेचे भूसंपादन होणार आहे. या ठिकाणीही मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यासाठी 254 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
रत्नागिरीमध्ये वाटद एमआयडीसीत हत्यारांचा तर रत्नागिरीत सेमीकंडक्टर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या सेमी कंडक्टर प्रकल्पाचा दुसरा टप्पा रिळउंडी परिसरात होणार आहे. उद्यागमंत्री उदय सामंत यांनी या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी शिरगाव एमआयडीसीत जागा उपलब्ध करून दिली आहे. या प्रकल्पांमुळे जवळपास 40 हजारहून अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत. पुढील पाच वर्षात त्यामुळे रत्नागिरीचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.



