
पाचवीच्या विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात १८ तर आठवीच्या विद्यार्थ्यास २१ गुण मिळाले तरच तो उत्तीर्ण होणार
इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलपास करण्याची पद्धत आता बंद झाली आहे. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा नेहमीप्रमाणेच होईल, पण अंतिम सत्र परीक्षेत दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे.पाचवीच्या विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात १८ तर आठवीच्या विद्यार्थ्यास २१ गुण मिळाले तरच तो उत्तीर्ण होणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ५ ते २५ एप्रिल या काळात होणार आहे. पण, अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करता येणार नाही. अंतिम सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या या दोन वर्गातील विद्यार्थ्यांना उन्हाळा सुटीत संबंधित विषय शिक्षकाने अतिरिक्त अध्यापन करून त्याची जूनमध्ये फेरपरीक्षा घ्यायची आहे. त्यात तो उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांना त्याच वर्गात बसावे लागणार आहे.