अलाहाबाद हायकोर्टाच्‍या ‘त्‍या’ निर्णयास सुप्रीम काेर्टाची स्‍थगिती!__

आम्हाला हे सांगताना दुःख होत आहे की निकाल देणाऱ्याच्या बाजूने संवेदनशीलतेचा पूर्ण अभाव दिसून येतोय,” अशा शब्‍दांमध्‍ये आज (दि.२६) सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्‍या पायजमाच्‍या नाडी तोडणे हे बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न या गुन्ह्यात येत नाही, या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.
उच्च न्यायालयाच्या एका वादग्रस्त निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. अल्पवयीन मुलीचे स्तन पकडून सलवारची दोरी ओढणे हा बलात्काराचा गुन्हा मानला जाऊ शकत नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली.
न्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, ही एक गंभीर बाब आहे. आम्हाला हे सांगताना दुःख होत आहे की निकाल देणार्‍यांमध्‍ये संवेदनशीलतेचा पूर्ण अभाव दिसून येतो.”
उच्च न्यायालयाचा निर्णय काय?

१७ मार्च रोजी दिलेल्या निकालात, अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले होते की पीडितेची छाती पकडून तिच्या सलवारची नाडी ताेडणे उघडणे हे बलात्कार किंवा त्याचा प्रयत्न या श्रेणीत येत नाही, तर ते तीव्र लैंगिक अत्याचाराच्या श्रेणीत गणले जाईल. खरं तर, कासगंज ट्रायल कोर्टाने आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि पोक्सो कायद्याच्या कलम १८ (बलात्काराचा प्रयत्न) अंतर्गत खटला चालवण्याचे निर्देश दिले होते; परंतु न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आदेश बदलला आणि म्हटले की आरोपीवर आयपीसीच्या कलम ३५४-बी (वस्त्रहरण करण्याच्या उद्देशाने हल्ला) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ९/१० (तीव्र लैंगिक अत्याचार) अंतर्गत खटला चालवावा. न्यायालयाने म्हटले की, “या प्रकरणात बलात्काराचा प्रयत्न हा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही, कारण बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यासाठी, हे सिद्ध करावे लागेल की घटना तयारी करून गुन्हा करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला गेला.”

नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण कासगंजच्या पटियाली पोलिस स्टेशन परिसरातील आहे. चार वर्षांपूर्वी, पीडितेच्या आईने १२ जानेवारी २०२२ रोजी सत्र न्‍यायालयात तक्रार दाखल केली होती. १० नोव्हेंबर २०२१ रोजी ती तिच्या १४ वर्षांच्या मुलीसह पटियाली येथील तिच्या मेव्हणीच्या घरी गेली होती. त्या संध्याकाळी परतताना त्यांच्याच गावातील पवन, आकाश आणि अशोक भेटले. पवनने पीडित मुलीला त्याच्या बाईकवरून घरी सोडतो असे सांगितले. वाटेत पवन आणि आकाशने पीडितेला पकडले आणि तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केला. यावेळी ट्रॅक्टरवरून जाणारे लोक घटनास्थळी धावले. परंतु आरोपी त्यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि पळून गेले, असे पीडितेच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button