सात वर्षाच्या बालिकेवर बलात्कार प्रकरणी आरोपीस जन्मठेप व २५ हजार दंड

चिपळूण जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी ठोठावली शिक्षा

रत्नागिरी, दि. 24 : सात वर्षाच्या बालिकेवर बलात्कार व लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी प्रकाश शंकर वाघे (वय ४० वर्षे रा. गुहागर) यास जन्मठेप व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा चिपळूण येथील जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांनी आज ठोठावली.

दि. 6 ऑक्टोबर 2019 रोजी ७ वर्षाची पीडित बालिका आपल्या भावासोबत व शेजारील मुलासोबत घराशेजारी खेळत होती. त्यावेळी आरोपी प्रकाश वाघे तिथे आला व लाकडे शोधायला गुरांच्याकडे चल, असे म्हणून तिला कलांडी येथील जंगलमय भागात घेवून गेला. तिच्यावर बलात्कार करुन, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेत सरळ घर गाठले व सर्व हकिकत तिच्या आईला सांगितली.

त्यानंतर तिच्या आईने गुहागर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरुध्द तक्रार दिली. या गुन्ह्याचा सखोल तपास करुन पोलिसांनी आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. या फौजदारी खटल्याची सुनावणी चिपळूण येथील अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांच्यासमोर झाली. सरकारपक्षातर्फे आरोपीचा गुन्हा शाबीत करण्याकरिता सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी एकूण १० साक्षीदार तपासून सबळ पुरावा न्यायालयासमोर आणला. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. बचावपक्षातर्फे आरोपीने स्वतः कोर्टासमोर साक्ष दिली व त्यानंतर दोन्ही बाजुच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्यायनिवडे देवून विस्तृत युक्तीवाद केला.

अंतिम युक्तीवादानंतर अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायाधीश डॉ. नेवसे यांनी सरकारपक्षाचा सखोल युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी प्रकाश शंकर वाघे यास पीडित बालिकेच्या बलात्कार प्रकरणी भा.द.वि. कलम ३७६(अब) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम ५ सह ६ अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेमुळे पीडित मुलीला न्याय मिळाल्याबाबत तिचे आईवडील नातेवाईक व समाज यांनी समाधान व्यक्त केले. सरकारी वकील श्री. शेट्ये यांनी सरकारपक्षातर्फे न्यायालयात भक्कम बाजू मांडली व सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास स.पो.नी. वर्षा शिंदे यांनी केला. तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार प्रदीप भंडारी यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button