
संगमेश्वरातील प्रसिद्ध देवी जाखमाता आणि निनावी देवीचा २८ मार्च रोजी शिंपणे उत्सव.
संगमेश्वर : महाराष्ट्रात प्रसिध्द असणारा संगमेश्वर येथील देवी जाखमाता आणि निनावी देवीचा शिंपणे म्हणजेच रंगपंचमी उत्सव संगमेश्वरसह कसबा येथे २८ मार्च रोजी संपन्न होणार असून, सध्या या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.संपूर्ण महाराष्ट्रात ज्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते त्या दिवशी संगमेश्वर तालुक्यात केली जात नाही. फाल्गुन अमावस्येला बलिदानास योग्य दिवस पाहून ही रंगपंचमी साजरी केली जाते. यालाच देवी जाखमातेचा आणि निनावी देवीचा शिंपणे उत्सव असे म्हणतात. यावर्षी हा उत्सव २८ मार्च रोजी होत आहे.
या उत्सवात दिवसभर लाल रंगाची उधळण करून भाविक देवीला रखवालीचे आणि नवसाचे नारळ, कोंबडे आणि बोकड अर्पण करतात. त्याचा प्रसाद करून रात्री मटण भाकरीच्या प्रसादाने दिला जातो आणि या उत्सवाची सांगता होते. या उत्सवात निघणारे रंगाचे फेरे हा येणाऱ्या भक्तगणांसाठी खास आकर्षणाचा विषय ठरतो.सर्वधर्म एकता आणि पारंपरिकता जपणाऱ्या या उत्सवात माहेरवाशिणी येऊन आनंद द्विगुणित करतात.