
लाच प्रकरणातील आरोग्य सेवकाला पोलीस कोठडी
बांधकामाच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप असलेल्या संशयिताला न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. शैलेश आत्माराम रेवाळे (३८) असे या संशयिताचे नाव आहे. शैलेश हा रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक म्हणून सेवा बजावत होता. लाचलुचपत विभागाकडून ३१ ऑक्टोबर रोजी सापळा रचून रेवाळे याला लाच स्वीकारत असताना अटक करण्यात आली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार शैलेश रेवाळे याने बांधकामासाठी आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील ना हरकत दाखला देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. आरोग्य सेवकांकडून होत असलेली लाचेची मागणीबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाकडून सापळा रचण्यात आला. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी रत्नागिरीमधील एका हॉटेलमध्ये १५ हजारांची लाच स्वीकारताना शैलेश रेवाळे याना पंचासमक्ष रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून बुधवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले.
www.konkantoday.com