
कंत्राटी शिक्षकांचे वेतन न झाल्यास डीएड बीएड कंत्राटी शिक्षक संघटनेचा आंदोलनाचा इशारा.
रत्नागिरी : कंत्राटी शिक्षकांचे वेतन न झाल्यामुळे २८ मार्च रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करत असल्याचा इशारा डीएड बीएड कंत्राटी शिक्षक संघटनेच्या वतीने दिला आहे. तशा आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, “जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये ४९१ शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली आहे. १०९ शिक्षकांची नियुक्ती १४ ऑक्टोबर २०२४ रोजी झाली आहे. तर ३८६ शिक्षकांची नियुक्ती ७ जानेवारी २०२५ रोजी झाली.
या सर्व शिक्षकांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे या सर्व शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. २७ मार्चपर्यंत या सर्व शिक्षकांचे वेतन न झाल्यास २८ मार्च रोजी आपल्या कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व कंत्राटी शिक्षक आंदोलन करणार आहेत, अशा इशारा डीएड, बीएड कंत्राटी शिक्षक संघटनेच्या वतीने सुदर्शन मोहिते यांनी दिला आहे.