
भाट्ये येथे ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात स्वाराचा जागीच मृत्यू
रत्नागिरी ते पावस रस्त्यावरील भाट्ये येथे ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात स्वाराचा जागीच मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी स्वाराचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. महेश अनंत पिलणकर (वय ४८, रा. टाकळे वाडी, फणसोप, रत्नागिरी) असे मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २३) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास भाट्य पूल येथे घडली.
महेश हे फिनोलेक्स कंपनीत कामाला होते. ते आपल्या दुचाकीवरुन रत्नागिरीकडे येत होते. अपघात घडल्याची माहितीही ट्रक चालकाला नव्हती. ट्रक चालक काही अंतर गेल्यानंतर नागरिकांनी ट्रक चालकाला थांबविले या अपघातात महेश पिलणकर यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ट्रक चालकाच्या हौद्याची जोरदार धडक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. महेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.