
शेतकऱ्याची ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने २५,००० रुपयांची आर्थिक फसवणूक.
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी परिसरात राहणाऱ्या एका शेतकऱ्याची ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने २५,००० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०:४४ वाजता घडली असून, याप्रकरणी रत्नागिरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी अरविंद सिताराम कांबळे (वय ४४, व्यवसाय-शेती, रा. घर नं. ६२, मु. विल्ये, पोस्ट तरवळ, ता.जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या घरी जाकादेवी येथे असताना “Pankaj Bhardwaj Way2laabh” या टेलिग्राम ग्रुपवरून शेअर ट्रेडिंग संदर्भात माहिती घेत होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने मोबाइल क्रमांक +९१७८५०९३९६७५ वरून व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला.
या व्यक्तीने फिर्यादी यांना एक क्यूआर कोड पाठवला, जो अरविंद यांनी स्कॅन केला. त्यानंतर त्यांनी आपल्या फोन पे अॅप्लिकेशनद्वारे “RINKEE KIRANA SHOP, ८३९००७५४१० @okbizaxis” या खात्यात २५,००० रुपये ट्रान्सफर केले.पैसे ट्रान्सफर केल्यानंतर फिर्यादी यांना त्यांच्या गुंतवणुकीवर १,४९,३७८ रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र, हा नफा मिळवण्यासाठी आरोपींनी फिर्यादींकडे या रकमेपैकी ३० टक्के रक्कम आगाऊ कमिशन म्हणून मागितली. फिर्यादी यांनी गुंतवलेली २५,००० रुपये आणि नफ्याची रक्कम परत न देता आरोपींनी त्यांची फसवणूक केली. या घटनेमुळे फिर्यादी यांचे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.