
मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील एका निवासी संकुलातील बंद असलेल्या फ्लॅटमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.
मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील एका निवासी संकुलातील बंद असलेल्या फ्लॅटमध्ये गुरुवार २० मार्च रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत झालेली व्यक्ती कोण आहे, बंद फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह कोणी ठेवला, त्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला, यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिस लगेचच घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला.हा मृतदेह विच्छेदनासाठी भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.
बंद फ्लॅटमध्ये पोलिसांना मृतदेहासह एक बॅग सापडली आहे. मात्र मृत व्यक्तीची अजून ओळख पटलेली नाही. मंडणगडचे पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.ज्या फ्लॅटमध्ये मृतदेह सापडला, त्या फ्लॅटचे मालक त्याच इमारतीत राहतात. हा फ्लॅट भाड्याने दिला जातो. आधीचा भाडेकरू काही दिवसांपूर्वीच निघून गेला आहे. त्यानंतर या फ्लॅटला फक्त कडीच लावलेली असायची. गुरुवारी इमारतीत घाण वास येत होता. हा वास कसला आहे, याच शोध घेताना हा मृतदेह दिसला. त्यामुळे ही घटना उघड झाली.