
माझं वय 84 होवो, 90 होवो, हे म्हातारं काय थांबणार नाही- शरद पवार.
लोकसभेला महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. लोकसभेला सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीच्या सरकारला ‘लाडकी बहीण’ आठवली. सत्ताधारी भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत.त्यामुळे महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा, याची दुसरी लढाई आपण हाती घेतली आहे. माझं वय 84 होवो, 90 होवो, हे म्हातारं काय थांबणार नाही. महाराष्ट्राला योग्य मार्गावर आणल्याशिवाय राहत नाही, असा एल्गार खा. शरद पवार यांनी फलटण येथे राजे गट पदाधिकार्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावेळी बोलून दाखवला. कोळकी (ता. फलटण) येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, खा. अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेतच आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, अनिकेतराजे ना. निंबाळकर, विश्वजितराजे ना. निंबाळकर यांच्यासह राजे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.