
“ज्यांच्या मुलीचं निधन झालं ते आई-वडील.”, संजय राऊतांचे दिशा सालियन प्रकरणाबाबत मोठं वक्तव्य!
दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे. “हे प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. जे प्रकरणच नव्हतं. त्या वडीलांचे जे म्हणणं आहे की त्यांच्यावर दबाव होता. खरंतर त्यांच्यावर आता दबाव आहे. हे प्रकरण तुम्ही नव्याने सुरू करा, असा आता त्यांच्यावर दबाव असावा हे मला स्पष्ट दिसतंय,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.
हे प्रकरण ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. ते म्हणाले की, “ज्यांच्या मुलीचं निधन झालं ते आई-वडील पाच वर्ष गप्प बसत नाहीत अशी माझी भावना आहे. महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. कुटुंबिय, आई-वडील हे न्यायासाठी समोर येतात, पोलीस तपासाला सहकार्य करतात. पाच वर्षांनंतर त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर दबाव होता, यावर तुम्ही कसा विश्वास ठेवणार आहात? या माध्यमातून ठाकरे कुटुंबाला आणि आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्याने जो प्रयत्न सुरू आहे तो स्पष्ट दिसतो आहे.”“औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं. औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढला, तो आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला पण तो औरंगजेब त्यांच्यावरच उलटला. त्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या ४ दिवसांपासून शिजतंय. यामागे कोणाची प्रेरणा आहे, कोणाची शक्ती आहे आणि कोण पडद्यामागे हलचाली करत होतं? याची सगळी माहिती आमच्याकडे आहे.
असं राजकारण तुम्ही करणार असाल तर ते राजकारण तुम्हाला लखलाभ ठरो,” असेही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.पुढे बोलताना राऊत म्हणाले की, “औरंगजेबाला साडे तीनशे-चारशे वर्षांनंतर कबरीतून बाहेर काढल्यानंतर अशा अनेक कबरी तुम्ही खोदत आहात त्या कबरीमध्ये तुम्हाला जावे लागेल. तुम्ही एका तरूण नेत्याच्या भविष्यावर अशा प्रकारे चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्यासारख्या अनेक नेत्यांवर असे प्रयोग झाले, त्यातून काही निष्पन्न झाले नाही. तरी तुमचे आयटी सेल काम करत आहेत. पण कोणत्या थरापर्यंत जायचं हे एकदा महाराष्ट्रातील राजकारण्यांनी ठरवायला पाहिजे.”
“भारतीय जनता पक्षाचे राज्य आल्यापासून आणि भाजपामध्ये काही बाडगे गेल्यापासून एकनाथ शिंदेंनी पक्ष फोडल्यापासून त्यांचे जे अस्वस्थ आत्मे आहेत, त्यांच्या हाताला फारसं काही लागत नाही, त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतिष्ठा मिळत नाही, सत्ता आली तरी ते अस्वस्थ आहेत, त्यातून त्यांना या अशा कागळ्या सुचत आहेत,” असेही संजय राऊत म्हणाले.*दिशा सालियनच्या वडिलांचा मुलाखतीत मोठा दावा*दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी रिपब्लिक या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांना दिशा सालियनची आत्महत्या होती की हत्या? तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला, उत्तर देताना ते म्हणाले की “एकंदरीत संपूर्ण तपास पाहता मला असं वाटतं की ही हत्याच आहे. कारण एखाद्या व्यक्तीची बॉडी १४ व्या मजल्यावरून पडते, पण तरीही त्या व्यक्तीच्या बॉडीवर एकही जखम दिसून येत नाही. डोक्यावरही कुठे जखम होत नाही, मग असं कसं होऊ शकतं? यावर विचार करायला हवा.
१४ व्या मजल्यावरून जर बॉडी पडली तरी ती बॉडी क्लिन कशी राहू शकते?”, असा सवाल सतीश सालियन यांनी उपस्थित केला.२०२२ मध्ये तुमच्यावर कोणाचा दबाव होता का? या प्रश्नावर बोलताना सतीश सालियन यांनी म्हटलं की, “माझ्यावर कोणाचाही कोणताही दबाव नव्हता. मात्र, मला तशा प्रकारे पटवून सांगण्यात आलं होतं. तसेच दिशा सालियन बरोबर जे होते ते कधीही खोटं बोलणार नाहीत असा विश्वास मला तेव्हा वाटला होता. तसेच तेव्हा आम्हाला पोलिसांनी देखील सांगितलं होतं की ही आत्महत्या आहे. तेव्हा आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवला होता”, असं सतीश सालियन म्हणाले आहेत.