
गणेशोत्सवासाठी कोकणातील मालवण येथील गावी आलेल्या जोडप्याचा करुण अंत.
गणेशोत्सवासाठी कोकणातील मालवण येथील गावी आलेल्या जोडप्याचा करुण अंत झाला. या घटनेमुळे ऐन सणासुदीच्या काळात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उषा हडकर असे पत्नीचे तर विपीन हडकर असे पतीचे नाव आहे.हडकर पती-पत्नी आपली दोन मुलं आणि आईसोबत गणेशोत्सवासाठी आपल्या मालवण येथील मसुरे गावात गेले होते. यावेळी घरातील सेप्टीक टँकचे झाकण साफ करताना उषा या टँकमध्ये पडल्या. काही वेळाने कामानिमित्त बाहेर गेलेले विपीन घरी आले तर उषा नव्हत्या. त्यांनी घरामध्ये सर्वत्र पाहिले पण उषा दिसल्या नाहीत. जवळच्या नातेवाईकांकडेही चौकशी केली. मात्र उषा तिथेही नव्हत्या.याचदरम्यान विपीन यांचे लक्ष सेप्टीक टँकच्या तुटलेल्या झाकणाकडे गेले. त्यांनी टँकजवळ जाऊन पाहिले उषा यांचा मृतदेह त्यांना दिसला. पत्नीचा मृतदेह पाहताच विपीन यांना धक्का बसला आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात विपीन यांचा मृत्यू झाला.विपीन यांच्या आईने माहिती दिल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. दोन्ही मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यानंतर अंत्यसंस्कारासाठी मुंबईत आणण्यात आले.