प्रख्यात चित्रकार विष्णू परीट यांनी सलग तीस दिवस विविध विषयांवरील तीस कलाकृती रेखाटून एक विक्रम केला

जलरंग माध्यमातून कोकणचा निसर्ग सर्वदूर पोहोचवणारे प्रख्यात चित्रकार विष्णू परीट यांनी सलग तीस दिवस विविध विषयांवरील तीस कलाकृती रेखाटून एक विक्रम केला आहे. देशस्तरावरील एका ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत सहभाग घेत त्यांनी हा विक्रम नोंदवला. चित्रकार म्हणून या स्पर्धेत सहभागी होताना विविध विषयांवर कलाकृती रेखाटल्याचा आनंद आपल्याला मिळाल्याचे परीट यांनी सांगितले.

चित्रकार हिना भट या दरवर्षी सलग एक महिना ऑनलाइन चित्र स्पर्धा आयोजित करत असतात. यामध्ये विद्यार्थी, कलाकार अशा विविध गटांचा समावेश असतो. देशाच्या विविध राज्यातून अनेक कलाकार या स्पर्धेत सहभागी होत असतात. कलाकाराने कलाकृती रेखाटनापासून अंतिम कलाकृती साकार होईपर्यंत त्याचे विविध टप्पे कलारसिकांपुढे सादर करणे या स्पर्धेत अपेक्षित असते. दररोज रात्री आठ वाजण्यापूर्वी अंतिम रेखाटन भट यांच्या साइटवर ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक ठेवण्यात आले होते.परीट यांनी १५ फेब्रुवारीला या स्पर्धेत सहभाग घेतला. ही स्पर्धा १६ मार्चला समाप्त झाली. या दरम्यान त्यांनी जलरंगासह ऑइल पेस्टल या माध्यमात काम केले.

विशेष म्हणजे केवळ निसर्गावर रेखाटन आणि रंगकाम न करता वेरूळची मंदिरे, बाजार, व्यक्तिचित्रे, गल्ल्या, रस्ते अशा विविध विषयांवर सलग तीस दिवस कलाकृती रेखाटल्या. या स्पर्धेदरम्यान विविध विषय हाताळण्याचा परीट यांनी निश्चय केला होता. एकही दिवस खंड न करता त्यांनी ही ऑनलाईन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे प्रख्यात चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य चित्रकार माणिक यादव, पुणे येथील चित्रकार सतीश सोनवडेकर, चित्रकार दत्ता हजारे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button