
परुळे- चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच अलायन्स एअरची विमान सेवा पुन्हा सुरू होणार.
परुळे- चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच अलायन्स एअरची विमान सेवा पुन्हा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्याचे आश्वासन खा.नारायण राणे यांना दिले.सिंधुदुर्ग विमानतळ सुरू झाल्या पासून येथून नियमीत सुुरू असलेली सिंधुदुर्ग-मुंबई ही अलयान्स एअरची विमानसेवा काही महिन्यापूर्वी बंद झाली.
ही सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी खा. नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू व राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्वाची आहे, तसेच विमानतळावरील अन्य सेवा, सुविधा , समस्या यांकडे लक्ष वेधले.सिंधुदुर्ग हा समुद्रकिनारे, विपुल नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक गड किल्ल्ले व धार्मिक स्थळे यामुळे देशी-विदेशी पर्यटकांचे आवडते पर्यटन ठिकाण आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना ‘उडान’ मध्ये सिंधुदुर्ग विमानतळाचा समावेश केला. त्यानंतर याच ‘उडाण’ योजनेंतर्गत अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी दैनंदिन विमानसेवा सुरू केली.
या विमानसेवेचा आरसीएस करार 3 वर्षांचा होता, जो ऑक्टोबर-2024 मध्ये संपला. त्यानंतर कंपनीने ही उड्डाण सेवा बंद केली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाईन वापरकर्त्या प्रवाशांवर परिणाम झाला आहे. मुंबई -सिंधुदुर्ग विमान सेवा सुरू असताना पर्यटकांना, जिल्हावासीयांना त्याचा मोठा लाभ होत होता. सणासुदीच्या काळात या मार्गावरील हवाई प्रवास तिकिट दर 25 हजार रूपये पर्यंत वाढायचा. या विमानसेवेला असा उत्कृष्ट प्रतिसाद असतानाही विमानसेवा बंद झाली.