
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रत्नागिरी जिल्हा बँकेला सदिच्छा भेट.
रत्नागिरी : राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्या हस्ते १७ मार्च रोजी रत्नागिरी शहरातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्याने अजित पवार यांनी बँकेस सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचे समवेत डॉ. उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी देवेंदर सिंग उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केली.
प्रस्तावनेदरम्यान उपाध्यक्ष यांनी वित्त मंत्री यांनी बँकेला भेट दिली, ही बाब बँकेकरीता भूषणावह असल्याचे नमूद केले. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी अजित पवार यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन आदरपूर्वक सत्कार केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा देखील श्री. चोरगे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ना. अजित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढून, बँकेच्या सभासदांना ३० टक्के लाभांश देणारी देशातील पहिली बँक असल्याचे तसेच बँकेच्या ठेवी, कर्जव्यवहार या गोष्टींचे अवलोकन करून बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे त्याचप्रमाणे राज्यातील पहिल्या पाच बँकांमध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश असल्याचे सांगितले.
आपले अनुभव कथन करताना ना. पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी ७ वर्षे कामकाज केल्याचे सांगून, बँकेमध्ये स्व. गोविंदरावजी निकम यांच्या समवेत कामकाज केल्याचे आग्रहाने नमूद केले. बँक राज्यामध्ये अग्रेसर होण्यासाठी डॉ. चोरगे यांचेसारखे अभ्यासू, चांगला उद्देश ठेऊन, आपल्या तत्वाशी बँक हितासाठी कोणतीही तडजोड न करता आणि बँकेला पूर्ण वेळ देणारे नेतृत्व मिळाल्यामुळे तसेच बँकेच्या सर्व संचालकांना विश्वासात घेऊन चांगले निर्णय घेतल्यामुळे, राज्यातील ५ अग्रगण्य जिल्हा बँकांमध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेचा समावेश झालेला आहे आणि त्यामुळेच राज्य सरकारने शासकीय निधी ठेवण्याकरिता मान्यता दिलेल्या १४ बँकांमध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे.
आज राज्यातील इतर जिल्हा बँकांना योग्य नेतृत्व न मिळाल्यामुळे तसेच त्या बँकांनी चुकीचा कर्जव्यवहार केल्यामुळे त्या बँका डबघाईला आल्या आहेत. अशा जिल्हा सहकारी बँकांमुळे सहकाराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला आहे. काही अडचणीतल्या बँकांना शासन हमी देऊन, राज्य बँकेकडून अर्थसहाय्य देऊन, सक्षम करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न सुरू आहे.रत्नागिरी जिल्हा बँकेला मिळालेले डॉ. चोरगे यांचेसारखे खंबीर नेतृत्व व सर्व संचालक मंडळाची साथ यामुळे पीक काँना वाव नसताना तसेच ठेवी संकलनाकरिता मर्यादा असतानाही डॉ. चोरगे यांनी बँकेचा अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारताना रु. ८०० कोटी व्यवसाय असलेली बँक आज रु. ५००० कोटी व्यवसायाकडे वाटचाल करीत असल्याबाबत कौतुक करून शुभेच्छा दिल्या.तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नक्त एनपीए सलग १२ वर्षे ० टक्के, सलग १४ वर्षे ऑडीट वर्ग ‘अ’ असल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच शासनाच्या ठेवी बँकेकडे वळविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नाम, डॉ. उदय सामंत व बँकेचे संचालक व आमदार शेखर निकम यांनी संबंधितांना सूचना द्याव्यात. तसेच जिल्हाधिकारी यांनीही यात लक्ष घालावे, असे सांगितले.
बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष पदाचा प्रदीर्घ अनुभव असून, या अनुभवातून सहकार चळवळ वृध्दींगत करताना काही सूचना त्यांनी केल्यास त्याचा शासन स्तरावरती निश्चितपणे विचार केला जाईल, याबाबत आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यास तत्पर आहोत. बँकेच्या प्रगतीमध्ये बँकेचे संचालक, सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे योगदान असून, त्यांनी सर्वांचे अभिनंदन करून व बँकेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी बँकेचे सर्व संचालक मंडळ तसेच अधिकारी कर्मचारी व सहकारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी बँकेचे उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.