
नितेश राणे यांचा बोलवता धनी कोण आहे? आमदार भास्कर जाधव यांचा सवाल
नागपूर शहरामध्ये काल (सोमवार, 17 मार्च) दोन गटांत संघर्ष झाल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला होता. एका गटातील युवकांनी पोलिसांवर आणि घरांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला.या सर्व घटनेवरती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे, त्याचबरोबर नितेश राणे यांच्यावर देखील टीका केली आहे.भास्कर जाधव यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, नागपूरमध्ये जी दंगल झाली, त्याचा मी निषेध करतो. अशांततेचं वातावरण तयार करण्याचं युतीच्या काही जबाबदार नेत्यांकडून मंत्र्यांकडून वक्तव्ये केली जातात.
या वक्तव्यातून महाराष्ट्रात अशांतता निर्माण व्हावी अशी भूमिका दिसतेय. हे सगळं सरकार निर्मित होतंय का? सरकार करतंय का? अशी शंका घेण्यास वाव आहे. औरंजेबाची कबर बांधून 400 वर्षे झाली. सातत्याने या कबरीचा विषय काढून उदोउदो करण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून होतंय. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. नितेश राणेंबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले, कोण नितेश राणे, त्यांना कशाकरिता मोठं करायचं. नितेश राणे वक्तव्य करेल आणि एवढं होईल असं नाहीये, नितेश राणे यांना बोलवता धनी कोण आहे? असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.
त्याच्यामागे एक व्यक्ती नसून एक संघटना आहे. औरंगजेबाच्या कबरीवरच इतर काम काढलं, मग कबर का नाही काढलं?अयोध्याच्या राम मंदिराचा प्रयोग आता कमी झालेला दिसतोय. त्यामुळे आता औरंगजेबाच्या नामाचा जप केला जातोय. एक व्यक्ती हे सगळं करू शकत नाही, त्यामागे एक संघटना आहे, ती सगळं बोलायला लावते, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.