
शिवभोजन थाळी’ आणि ‘आनंदाचा शिधा’ या योजना बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेत शिवभोजन थाळी अन् आनंदाचा शिधा याबद्दल मोठी घोषणा केली आहे. याबद्दल लेखी उत्तरात त्यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकारने ‘शिवभोजन थाळी’ आणि ‘आनंदाचा शिधा’ या योजना बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.या योजनांच्या काही पुरवठादारांचे (व्हेंडर्स) देयके प्रलंबित असून, ती लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनांमुळे हजारो लोकांना परवडणाऱ्या दरात जेवण आणि अन्नधान्य मिळत आहे. ‘शिवभोजन थाळी’ योजनेअंतर्गत गरिबांना कमी दरात पोषणमूल्ययुक्त जेवण दिले जाते, तर ‘आनंदाचा शिधा’ योजनेत लाभार्थ्यांना स्वस्त दरात अन्नधान्य पुरवले जाते. गेल्या काही महिन्यांपासून या योजनांच्या विक्रेत्यांचे पैसे थकीत असल्याने अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे सरकारकडून तातडीने उपाययोजना करून थकीत रक्कम लवकरच वितरित करण्यात येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.