
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रत्नागिरी येथे दशावतार प्रशिक्षण शिबिर.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रत्नागिरी येथे दशावतार प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक 17 मार्च 2025 ते 25 मार्च 2025 त्या कालावधीत दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेमध्ये होणार आहे.महाराष्ट्रातील लोककलांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने शासनाच्या वतीने दरवर्षी लोककलेचे अनेक उपक्रम राबवले जातात. त्या अंतर्गत प्रयोगात्मक लोककलांचे प्रशिक्षण म्हणून दशावतार या लोककलेचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रत्नागिरी मधील गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) मधील सेमिनार हॉलमध्ये घेण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोपासल्या जाणाऱ्या दशावतार लोककलेमधील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध कलाकारांचे मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक या शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे.सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडत आहे.