
कोकण रेल्वे कार्पोरेशन हे भारतीय रेल्वेत कर्जासहित विलीनीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा- आ.प्रवीण दरेकर
यांचे मागणीकोकण रेल्वे कार्पोरेशन हे भारतीय रेल्वेत कर्जासहित विलीनीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे गटनेते आ.प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषद सभागृहात केली.सध्या महाराष्ट्र विधिमंडळ सभागृहाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. प्रवीण दरेकर यांनी कोकण रेल्वेच्या मुद्द्यावर विधान परिषदेमध्ये मत मांडले. कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांच्या दूरदर्शीपणामुळे कोकण रेल्वे साकारली आहे, ती भारतीय रेल्वे विलीनीकरण व्हावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.
सन 1990 च्या दशकात ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’, या तत्त्वावर साकारली आहे. कोकण रेल्वे प्राधिकरण महामंडळाच्या माध्यमातून रेल्वेची बांधणी झाली. त्यानंतर दहा वर्षात भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावी असे ठरले असताना आज 25 वर्षे झाली तरी कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीनीकरण झालेले नाही. कोकण रेल्वे महामंडळ आर्थिक अडचणीत असल्यामुळे रेल्वे दुहेरीकरण, स्थानक बांधणे, पायाभूत सुविधा बाबतची कामे ठप्प आहेत. तसेच भारतीय रेल्वेकडून कोकण रेल्वेला अर्थसंकल्पात स्थान व निधी मिळत नाही. त्यामुळे कोकण रेल्वे महामंडळ कर्जासहित भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यात यावे आणि त्यासाठी मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधावे, अशी मागणी आ. दरेकर यांनी केली आहे. याबाबत सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने आ. दरेकर यांना धन्यवाद दिले आहेत.